‘आम्ही चीनची वस्तू विकत नाही’, कोल्हापुरात युवासेनेची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वासघातकी चीनकडुन हिंदुस्थानी सैनिकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चिनी उत्पादनांवर जनतेकडूनच उत्स्फुर्तपणे बहिष्कार घालण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर युवा सेनेच्या वतीने शहरातील दुकानांवर ‘आम्ही चिनी वस्तू विकत नाही’ अशा आशयाची स्टिकर लावण्याची मोहीम घेण्यात आली.

युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची ऐतिहासिक बिंदू चौक येथुन सुरूवात करण्यात आली. शिवाजी रोडवरील दुकानांवर स्टिकर लावताना, दुकानदारांनीही उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.चीनकडून झालेल्या हल्लात हिंदुस्थानचे जवान शहीद झाले आहेत.त्यामुळे हिंदुस्थानी जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच चीनला व अद्दल घडविण्यासाठी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडायचे असेल, तर चीनची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या हिंदुस्थानात सर्व चीनी उत्पादनांची विक्री व खरेदी बंद करणे हाच पर्याय असल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.

यावेळी चिनी कंपन्यांची उत्पादने विक्री करू नये, असे जाहीर आवाहन युवासेनेकडुन व्यापाऱ्यांना करण्यात आले. यापुढे शहर तसेच जिल्ह्यात व्यापाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मंजित माने,चैतन्य अष्टेकर, शेखर बारटक्के,अवधेश करंबे,सनराज शिंदे, अर्जुन कदम,तब्बू करोली,विजय दरवान आदी सहभागी होते.