सर्वोत्कृष्ट नाट्य पुरस्कारांसाठी चुरस

118

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस्’च्या निमित्ताने विनोदी कलाकारांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. विनोदाच्या सहाय्याने मनोरंजन करण्यात नाटय़क्षेत्रही मागे नाही. अनेक विनोदी नाटकांची निर्मिती मराठी रंगभूमीवर होत असते. अशाच काही नाटकांमध्ये ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस्’मधील पुरस्कार पटकावण्यासाठी यंदा मोठी चुरस आहे. नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट नाटक, संहिता, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता व अभिनेत्री असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. एका लग्नाची पुढची गोष्ट, यदाकदाचित रिटर्न्स, मिस्टर अँड मिसेस लांडगे, दहा बाय दहा, व्हॅक्यूम क्लीनर अशा एकाहून एक दर्जेदार नाटकांमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून नाव मिळवण्यासाठी चुरस असलेली पाहता येईल. अद्वैत दादरकर, राजेश देशपांडे, संतोष पवार, चिन्मय मांडलेकर, विजय केंकरे अशी उत्तमोत्तम दिग्दर्शकांची नावे पाहता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान मिळवणेही कठीण जाणार आहे. प्रशांत दामले, विजय पाटकर आणि अशोक सराफ हे दिग्गज एकमेकांना टक्कर देणार की सुशांत शेलार, आशीष पवार हे अभिनेते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब पटकावणार ते पाहूया. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निर्मिती सावंत, परी तेलंग, कविता लाड या स्पर्धेत असतील. अतुल तोडणकर, राजेश भोसले, संजय खापरे, आशुतोष वाडेकर आणि हृषिकेश शिंदे हे सहायक अभिनेता म्हणून नामांकित असल्याने ही लढतसुद्धा पंचरंगी ठरणार आहे. प्रतीक्षा शिवणकर, माधुरी गवळी, श्रद्धा मोहिते, मधुरा देशपांडे, विदिशा म्हसकर या अभिनेत्री सहायक भूमिकेसाठी असलेली लढत चुरशीची करतील.

आपली प्रतिक्रिया द्या