मराठी शाळेतील इयत्ता पहिलीचे प्रवेश घटले; आजरा तालुक्यात शून्य प्रवेश असलेल्या शाळांची स्थिती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यात यावर्षी शासनाच्या प्राथमिक मराठी शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल झालेली विद्यार्थी संख्या चिंता वाढवणारी ठरली आहे. यावर्षी तालुक्यातल्या प्राथमिक शाळांमध्ये 669 मुले व मुली दाखल झाल्या आहेत. तर, खासगी शाळांमध्ये 147 मुले-मुली दाखल झाल्याचे चित्र आहे.

आजरा तालुक्यातील साधारणतः तीन गावच्या शाळांमध्ये तर पहिलीच्या वर्गामध्ये दाखल होणारी पटसंख्या शून्य आहे. म्हणजे पुढील दरवर्षी या गावांमधील एक वर्ग मोकळाच राहणार की काय, अशी स्थिती आहे. तालुक्यात पहिलीच्या वर्गातील घट अंदाजे 2-3 टक्के मानली, तरी यापेक्षाही तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील एकूण पटसंख्याही 500 ने घटली असल्याचे चित्र गंभीर आहे.

आजरा तालुक्यात जूनच्या मध्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विविध शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात 6 प्लस वयोगटातील एकंदर 855 विद्यार्थी दाखल झाले. यामध्ये 455 मुले, तर 400 मुली आहेत. यातील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये दाखल झालेली एकूण विद्यार्थीसंख्या 669 आहे. तर, उर्वरित खासगी शाळांमध्ये 147 विद्यार्थी दाखल झाले आहेत. सर्वेक्षणाबाहेरही काही विद्यार्थी आहेत.

या आकडेवारीनुसार यावर्षी पहिलीच्या वर्गात दाखल झालेली विद्यार्थी संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत खूपच रोडावल्याचे चित्र स्पष्ट आहे. यास घटलेला जन्मदर आणि इतर कारणे जबाबदार असली, तरीही कोरोनानंतरच्या काळात येथे आलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना शहरातील शाळांमध्ये पुन्हा दाखल केल्याचा हा मुख्य परिणाम असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याची मते अधिकारी तसेच शिक्षक व्यक्त करीत आहेत.

वास्तविकतः शासकीय प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून विविध प्रयत्न सुरू असतात. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध शिष्यवृत्तीस्तरीय यशासह मुलांच्या अभ्यासेतर सांस्कृतिक कला, कौशल्य आणि कीडा क्षेत्रातील गुणांना वाव देण्याचा जातीने प्रयत्न होत असतो. त्यातून दरवर्षी काही शाळांचे कलाकार विद्यार्थी राज्यस्तरीय ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत. तरीही अनेक ग्रामीण पालकांची तालुक्यातील काही इंग्रजी माध्यम शाळांकडे ओढा वाढतो आहे. याचा फटका शासकीय प्राथमिक शाळांना बसतो आहे, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे, असे आजरा पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी गुरव आणि विस्तार अधिकारी चंद्रमनी यांनी सांगितले.

शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धात्मक परीक्षेत वाढ होण्यासाठी प्राथमिकचे शिक्षक कष्ट करीत असतात. पण अनेक पालकांचा ओढा हा खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत आहे. यासोबत घटता जननदराचाही फटका या भागातील शाळांना बसत आहे. काही गावांमध्ये 0 ते 1 वयोगटातील मुलांची संख्या कमी झाल्याने भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.