24 ऑगस्ट रोजी लिंगायत आरक्षणासाठी जिल्हा बंदचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

महाराष्ट्रातील एक कोटीच्या जवळपास असणाऱ्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. 2014 साली आघाडी सरकारने लिंगायतांना आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र त्यापुर्वी आरक्षित असलेल्या जातींनाच आरक्षण दिले. त्यामुळे लिंगायत समाजाची फसवणूक झाली. त्या दिवसापासून आम्ही सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावे ही मागणी करत आहोत. फडणवीस शासनाकडेही हीच मागणी आम्ही सातत्याने लावून धरली. लातूरात झालेल्या प्रत्येक बसव महामेळाव्यात सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावे ही मागणी समाजाने अनेक नेत्यांकडे केली. तरीही आरक्षण न मिळाल्याने आता नाइलाजाने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले असल्याचे लिंगायत आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

27 एप्रिल 2018 रोजी सोलापूर येथे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावून हीच मागणी तेथीलही समाजबांधवांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात आपल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन दिले होते.

लिंगायत समाजाबरोबर मराठा, धनगर, मुस्लीम समाजाच्याही आरक्षणास आमचा पाठींबा आहे. 24 रोजी होणारा बंद शांततेत व्हावा, व्यापारी वर्गाला व समाजाला त्रास होऊ नये म्हणून 9 ते 2 वाजेपर्यंतच हा बंद आहे. कार्यकर्त्यांनी शांततेत वागावे व समाजबांधवांनी लातूर जिल्हावासियांनी आमच्या मागणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी व सर्व तहसिलदारांमार्फत निवेदन दिले जाईल. त्यानंतर बंद समाप्त होणार असल्याचे लिंगायत आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. प्रत्येक समाजबांधवांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे व आपापल्या पातळीवर बंद यशस्वी करावा. बंद दरम्यान शांतता पाळावी, लिंगायत समाजाच्या आदर्शाप्रमाणे वागावे, अफवेवर विश्वास ठेवू नये, प्रत्येकांनी एक दिवस समाजासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.