
जुन्या वादातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांना त्यांची कार अडवून दोघा महिलांसह चौघांनी मारहाण केली. घुलेवाडी शिवारात सोमवारी सकाळी ही घटना घडली असून, इतर दोघांनी त्यांना प्रोत्साहन देत या संपूर्ण प्रकरणाचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते सोशल मीडियात व्हायरल केले. याप्रकरणी राऊत यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग, भारत संभाजी भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संबंधित महिला व राऊत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा वाद असून, त्यांच्यात यावरून नेहमीच वादावादी होत असते. आज सकाळीही असाच प्रकार घडला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले सीताराम राऊत हे नेहमीप्रमाणे घुलेवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आपल्या वाहनातून जात असताना दोघा महिलांनी त्यांच्या वाहनाला आपले वाहन आडवे उभे केले. यावेळी विद्या अभंग व कविता अभंग यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राऊत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलांनी राऊत यांना वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडले. ते वाहनाच्या बाहेर येताच कविता अभंग यांनी त्यांच्या शर्टची कॉलर पकडली. तर विद्या अभंग यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चेनही ओढून घेतली. हा प्रकार सुरू असताना भारत भोसले याच्यासह विद्या अभंग यांचा मुलगा प्रथमेश याने आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केले. हा प्रकार घडत असताना संगमनेर साखर कारखान्याच्या एका बडय़ा पदाधिकाऱयाने मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या महिलांनी त्यांनाही दाद दिली नाही. या घटनेनंतर सीताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हल्ल्याच्या निषेधार्थ आज ‘घुलेवाडी बंद’ची हाक
– संगमनेर शहरालगत असणाऱया घुलेवाडी या गावातील वजनदार राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांना झालेल्या मारहाण व शिवीगाळ याच्या निषेधार्थ तसेच याचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी (दि. 20) घुलेवाडी गाव बंदची हाक देण्यात आली आहे.




























































