
महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला आज स्थगिती देण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशीव, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱयांना राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे.



























































