जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका; 5 ऑक्टोबरला मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत तसेच कोविडचे निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 5 ऑक्टोबरला मतदान होईल तर लगेच दुसऱया दिवशी 6 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

कोरोनाच्या संसर्गामुळे पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्त पदांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल. निवडणुकीसाठी 15 ते 20 सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येतील. या अर्जांची छाननी 21 सप्टेंबर रोजी होईल तर अर्ज 27 सप्टेंबरपर्यंत मागे घेता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.