
सात मैत्रिणी. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी, परंतु समान गोष्ट एकच आहे ती म्हणजे त्यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम. अशा मैत्रीच्या नात्याने जोडल्या गेलेल्या मैत्रिणींची गोष्ट सांगणारा चित्रपट ‘झिम्मा 2’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, संगीतकार अमितराज, गायिका वैशाली सामंत यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा 2’ मध्ये ‘झिम्मा’मधील मैत्रिणींची धमाल आता पुन्हा पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’च्या निमित्ताने बहरलेल्या या मैत्रीची वीण ‘झिम्मा 2’मध्ये अधिकच घट्ट होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘‘खरं तर ‘झिम्मा’मध्ये दिसलेल्या या मैत्रिणी फक्त पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही तशाच एकमेकांना जीव लावणाऱया आहेत. त्यामुळे ‘झिम्मा 2’मध्ये त्यांची ही मैत्री अधिकच घनिष्ठ दिसणार आहे.’’ ‘झिम्मा 2’ येत्या 24 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.





























































