
आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सध्या जागतिक स्तरावर रोजगाराच्या बाबतीत मोठी चर्चा आणि भीती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील हा बदल केवळ कामाची पद्धतच नाही, तर नोकऱ्यांचे स्वरूपही पूर्णपणे बदलून टाकत आहे. ‘एआय’मुळे जवळपास प्रत्येक क्षेत्रातील नोकऱ्यांवर गडांतर येणार असून याची सुरुवातही झाली आहे. अनेक बड्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून उर्वरितांना ‘एआय’ तंत्रज्ञान शिकून घेण्याची गळही घातली आहे. मात्र जोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी ‘एआय’मुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या संकटावर एक आगळीवेगळी भूमिका मांडली आहे.
श्रीधर वेम्बू यांनी केवळ तांत्रिक कौशल्यांवर आधारित नोकऱ्यांऐवजी अशा कामांची यादी दिली आहे, जी मानवी मूल्ये, संस्कृती आणि सेवेशी जोडलेली आहेत. वेम्बू यांच्या मते ही कामे केवळ पैशासाठी केली जात नाहीत, तर त्यामागे एक सामाजिक उद्देश असतो. ही कामने नेमकी कोणती आहेत याची यादी खालीलप्रमाणे आहे.
1. लहान मुलांचे संगोपन करणे अर्थात पाळणाघर चालवणे
2. शिक्षकी पेशा
3. वृद्धांची काळजी घेणे
4. शेती करणे
5. वनरक्षक म्हणून निसर्गाचे संगोपन करणे
6. स्थानिक मंदिरातील पुजारी
7. संस्कृती आणि परंपरा जोपासणारी कामं
8. शास्त्रीय संगीत शिकवणे आणि सादरीकरण करणे
9. सामाजिक सेवा आणि समुदायाला एकत्र बांधणारी कामे
10. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित कार्य
‘एआय’मुळे महिलांच्या नोकरीला सर्वाधिक धोका, मूडीजच्या अहवालाचा धक्कादायक अंदाज
जर आपण आपले अस्तित्व केवळ आर्थिक उत्पन्न किंवा बौद्धिक प्रतिष्ठेशी जोडले, तर ‘एआय’च्या काळात आपल्याला मानसिक धक्का बसू शकतो. कारण ‘एआय’ पांढरपेशी नोकऱ्या सहज करू शकेल, असे वेम्बू म्हणाले. तसेच ‘एआय’मुळे उत्पादनात मोठी वाढ होईल आणि वस्तूंची रेलचेल असेल. खरा प्रश्न हा असेल की, जर लोकांकडे नोकऱ्या नसतील, तर त्या वस्तूंचा उपभोग लोक कसा घेणार? हा एक राजकीय-आर्थिक प्रश्न ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
एआय शिका, नाहीतर प्रमोशन-पगारवाढ विसरा, कॉर्पोरेट कंपन्यांनी उचलले कडक पाऊल
























































