
देशाची सायबर सुरक्षा एजन्सीने अॅपल युजर्ससाठी हाय अलर्ट जारी केला आहे. इंडियन कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (सीईआरटी- इन) आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर अॅपल डिव्हाइसेसमध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा गैरफायदा घेत हॅकर्स डिव्हाइसवर दूरस्थपणे नियंत्रण मिळवू शकतात आणि संवेदनशील माहिती चोरू शकतात. यामध्ये बँक तपशील, पासवर्ड, वैयक्तिक फोटो आणि चॅट्स यांचा समावेश असू शकतो.
सीईआरटी- इन च्या सल्ल्यानुसार, या त्रुटींमुळे हॅकर्सना ‘आर्बिट्ररी कोड रन’ करण्याची परवानगी मिळते, म्हणजेच ते युजर्सच्या परवानगीशिवाय डिव्हाइसच्या सिस्टिममध्ये प्रवेश करून सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊ शकतात. परिणामी, डिव्हाइस व्रॅश होणे, डेटा चोरी होणे किंवा पूर्ण सिस्टिमवर नियंत्रण जाणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
हा धोका विशेषतः जुन्या सॉफ्टवेअर व्हर्जन वापरणाऱया युजर्ससाठी अधिक आहे. अॅपल सॉफ्टवेअरचे जुने व्हर्जन वापरणाऱया डिव्हाइसेस सर्वाधिक जोखमीच्या कक्षेत आहेत. त्यामुळे वेळेवर अपडेट न करणाऱ्या युजर्सनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे.
काय कराल?
या धोक्यापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसचे नवीन सॉफ्टवेअर अपडेट त्वरित इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अॅपलने या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक सुरक्षा पॅचेस जारी केले आहेत.
अनोळखी ई-मेल किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये. अॅप्स डाऊनलोड करताना केवळ अधिकृत अॅप स्टोअरचाच वापर करावा. तसेच आपल्या महत्त्वाच्या डेटाचा नियमित बॅकअप ठेवणेही अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कोणतीही अडचण आल्यास डेटा सुरक्षित राहील.

























































