
मांजरी रस्ता परिसरासह मार्केटयार्ड परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना 29 आणि 30 मे रोजी घडल्या आहेत. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून विद्युत खांबाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. ही घटना 30 मे रोजी दुपारी पावणेएकच्या सुमारा मांजरी रस्ता परिसरात घडली.
आबा भानुदास घाडगे (वय – 42, रा. वेताळवाडी, मांजरी बुद्रूक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संकेत रावखाडे (वय – 29, रा. वारजे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आबा दुचाकीवरून मांजरी हद्दीतून चालले होते. त्यावेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी विद्युत खांबाला धडकली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे आबा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.
दुसऱ्या अपघातात अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात 29 मे रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील आई-माता मंदीरासमोरील रस्त्यावर झाला. अतुल जयंतीलाल कोठारी (वय – 45, रा. मार्केटयार्ड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर मुंडे तपास करीत आहेत.




























































