लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, महायुतीच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं

राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुका जिंकताच त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

”लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास, निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिलं जातं”, असं ते म्हणाले. बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बाबासाहेब पाटील बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.