सवा लाखाच्या मताधिक्याची खात्री…जोगेश्वरी पूर्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एकेकाळी अतिशय संवेदनशील व दंगलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचा मागील काही वर्षांत चेहरामोहराच बदलत गेला आहे. त्याचे श्रेय शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनाच दिले पाहिजे. कारण 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना असंख्य नागरी सुविधा दिल्या आहेत आणि मागील 10 वर्षे आमदार म्हणून काम करताना त्यांनी कामाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे.

प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर हे 64 हजार 318 मतांनी तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  72 हजार 767 मते मिळवून निवडून आले आहेत. वाढत जाणारे मताधिक्यच त्यांच्या कामाची पोचपावती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार शिल्लकच राहिलेला नाही. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे भाई जगताप होते. आता तर भाई जगताप यांनी हा मतदारसंघच सोडून दिला. यंदाच्या निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुनील कुमरे, वंचित बहुजन आघाडीचे दिलबाग सिंग, ‘आप’चे विठ्ठल लाड  रिंगणात आहेत. पण जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील रस्ते, उद्याने, रुग्णालय पूल, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, आदिवासी पाडय़ांवरची कामे, भुयारी मार्ग अशा असंख्य कामांमुळे येथील मतदार पुन्हा वायकर यांच्या नावावरच पसंतीची मोहोर उमटवतील अशी चिन्हे आहेत.

ही कामे प्रगतीपथावर

या मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांसाठी व महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामुळे आज अनेकांचे प्राण वाचले आहेत. मेट्रोच्या कामामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या संजय गांधी व पारसी पंचायत येथील भुयारी मार्गाची कामे प्रगतिपथावर असून जोगेश्वरी  पूर्व-पश्चिम जोडणाऱया दक्षिण उड्डाणपुलाच्या वेरावलीपर्यंतच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर संत शिरोमणी गाडगे महाराज मार्ग म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडची रुंदी 50 फूटांनी वाढवून 150 फूट होणार आहे. या रस्त्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही कामे झाल्यावर जोगेश्वरीतील वाहतूक समस्या सुटेल. महानंदा ते नेस्को हा रस्ता पादचाऱयांना सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी 2 कोटी 43 लाख रुपये खर्च करून 81 फूट लांबीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.

विकासकामे

रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांचेही जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. 27 आदिवासी पाडय़ांचे पुनर्वसन एकाच ठिकाणी करून त्यांना 480 चौरस फुटांचे घर देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याशिवाय आदिवासी पाडय़ांवर पिण्याच्या पाण्याची लाइन, वीस कोटी रुपयांची पाण्याचे पंप स्टेशन,  सोलार लाइट, बायोटॉयलेटही उपलब्ध करून दिले आहे. आरेमध्ये झोपडय़ाही आहेत. त्यांना एका बाजूला करून त्यांना 300 चौरस फुटांचे घर देण्यासाठी ही योजना डीपीमध्ये मंजूर करून घेतली आहे. आरेमधील टोल नाका बंद करण्याचे श्रेय रवींद्र वायकर यांनाच जाते. त्यांच्या मतदारसंघातील इस्माईल कॉलेजला ‘नॅक’चा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.  शहीद अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर, मेजर उन्नीकृष्णन्न या शहीदांच्या नावाने व इतर अकरा उद्याने उभारली. या विभागातील गरीब मध्यमवर्गीयांसाठी संडास पाणी, गटारे अशा सुविधा दिल्या तर मध्यमवर्गीयांसाठी मार्केट, व्यायामशाळा, शाळा, वाचनालय, जॉगिंग ट्रक, वाचनालय अशा सुविधा दिल्या तर श्रीमंत वर्गासाठी मातोश्रीसारखा क्लब बांधला. मुंबईत सर्वाधिक शौचालये या मतदारसंघात बांधली. या मतदारसंघातील सर्वच समाजाच्या सर्वच स्तरातील मतदारांसाठी कामे व अगदी दिवाळी पहाटपासून आदिवासी पाडय़ांवरील दिवाळी, कोकण महोत्सव बिर्याणी महोत्सव, क्रीडा स्पर्धा केल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सवा लाखाच्या मताधिक्याने निवडून येण्याची रवींद्र वायकर यांना खात्री आहे.