साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सातारकरांसह तमाम जिल्हावासीय रस्त्यावर उतरल्याने विसर्जन मिरवणुकीत उत्साहाला उधाण आले. ढोल-ताशे, झांज तसेच लेझीम यांच्या निनादात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा अखंड जयघोषाने गणेशभक्तांनी आसमंत दणाणून सोडला. आज दुपारी बाराच्या सुमारास सातारा शहरातील मानाच्या शंकर-पार्वती-गणपती मूर्तीच्या विसर्जनाबरोबरच जवळपास 15 तासांनी सातारच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

सातारा येथील सातारा नगरपालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मान्यवर मंडळांच्या गणेशमूर्ती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. ही विसर्जन मिरवणूक आज दुपारपर्यंत भक्तिरसात न्हाऊन निघाली.

यावर्षी प्रथमच मानाच्या पाच महागणपतींची आरती मध्यरात्री राजवाडा परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच आनंद उपस्थितांना मिळाला. रात्री बारानंतर विसर्जन मिरवणुकीतील वाद्यवृद्धांना थांबवून गणेशमूर्तींना विसर्जनासाठी पुढे नेण्यासाठी घाई सुरू झाली. रिमझिम पावसात सायंकाळी सहा वाजल्यापासून राजवाडा, मोती चौक, सदाशिव पेठ, राजपथ हा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. वाद्यांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी, यामुळे विसर्जन मिरवणुकीचे वातावरण बेधुंद झाले होते. विसर्जन मार्गावर विविध मंडळांच्या स्वागतासाठी उभारलेल्या स्वागत कक्षात मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.

रात्री आठ ते बारा या वेळेत ही विसर्जन मिरवणूक अतिशय संथगतीने पुढेपुढे सरकत होती. मात्र, रात्री बारानंतर वाद्य वाजवण्यास आणि थांबवण्यास पोलीस प्रशासनाने सांगितल्यानंतर या मिरवणुकीने विसर्जनासाठी वेग घेतला. अनेक मंडळांच्या गणेशमूर्ती अतिशय महाकाय उंचीच्या असल्यामुळे त्या विसर्जन मिरवणूक मार्गावरून नेताना वारंवार अडथळे येत होते.

सातारा शहरातील मानाचा महासम्राट गणपती, सदाशिव पेठ येथील पंचमुखी गणेश मंडळ अर्थात प्रताप मंडळ, शनिवार पेठ येथील मान्यवर मंडळ तसेच मल्हार पेठ येथील मंडळाची मिरवणूक काढण्यात आली होती. अनेक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आपापल्या पद्धतीने सायंकाळपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन नेमून दिलेल्या विसर्जन तळ्यामध्ये केले. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गृहरक्षक दलाचे जवान तसेच स्वयंसेवक मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी झटत होते. शनिवारी मानाच्या महागणपती सम्राट मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने सुरुवात झालेली ही विसर्जन मिरवणूक रविवारी पावणेबारा वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेश मूर्तीच्या विसर्जनाने समाप्त झाली.