
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नुकताच जाहीर झालेला सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्यात आला. 4 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर 16 दिवसांत तब्बल 1.67 कोटी उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. पेपर तपासणीत चूक होऊ नये यासाठी एक उत्तरपत्रिका 12 परीक्षकांकडून तपासण्यात आली.
सीबीएसई निकालाच्या प्रक्रियेत तब्बल दीड लाख परीक्षक सहभागी झाले होते. यात 1.1 लाख परीक्षक होते तर तीन हजार इतर कर्मचाऱयांचा समावेश होता. तसेच यंदा प्रथमच पेपर तपासणी केंद्रांची संख्या 40 टक्क्यांनी वाढविण्यात आली. प्रत्येक दिवशी सुमारे 5.6 लाख उत्तरपत्रिका तपासण्यात येतात.
यंदा उत्तरपत्रिकांचे क्रॉस व्हेरिफिकेशन
दोन परीक्षक आपल्याकडील उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले. चार परीक्षकांनी 100 उत्तरपत्रिका तपासल्या. एक मुख्य परीक्षक आणि तीन सहाय्यक परीक्षकांच्या अखत्यारित 300 उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. तसेच सोशल सायन्स आणि फिजिकल एज्युकेशन या उत्तरपत्रिकांच्या तपासणीवेळी 1.1 लाख परीक्षकांनी एकाच दिवशी 18 लाख उत्तरपत्रिका तपासल्या. – संजय भारद्वाज, परीक्षा नियंत्रक, सीबीएसई

























































