
सामना प्रतिनिधी । नांदेड
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या वाहनावर धडक कारवाई करून एक कोटी २० लक्ष ४४ हजार ५४१ रुपयांचा १२० बाबा नावाचा सुगंधीत तंबाखूचा कंटेनर पकडून त्यावर कारवाई केली.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची ने-आण होते, याची खबर पोलिसांना होती. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सीमेवरुन येणाऱ्या या गुटख्यावर नजर ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांनी काल मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मरखेल-तुंबरपल्ली रस्त्यावर सापळा रचला. याठिकाणाहून जाणाऱ्या कंटेनर क्र.युपी-१४-एफटी-७१९८ ची तपासणी केली. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणारा १२० बाबा नावाचा सुगंधी तंबाखू होता. आपल्या सोबत असलेले सहकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह याची सखोल तपासणी केली. कागदपत्रांचीही पाहणी केली. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची ने-आण करणारा हा कंटेनर मरखेल पोलिसांनी जप्त केला. कंटेनर व सुगंधीत तंबाखूसह याची किंमत १ कोटी २० लक्ष ४४ हजार ५४१ एवढी होते. हा कंटेनर मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून, कंटेनर चालक महेश बिशक्रर्मा रा.रोनग्राम जि.भेट यास ताब्यात घेण्यात आले आहे. आंध्र व कर्नाटकच्या हद्दीत सध्या गुटखा चालू आहे, त्याचाच फायदा घेवून या गुटख्याची ने-आण महाराष्ट्रात होत असल्याची गुप्त खबर जिल्हा पोलीस अधीक्षकांना लागली होती. त्यांच्या सुचनेवरुन मरखेल पोलिसांनी कारवाई केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ याबाबत सखोल तपास करीत असून, अन्न व औषध प्रशासनाला याबाबत पाचारण करण्यात आले आहे.




























































