शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 1 कोटी 43 लाखांची फसवणूक 

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ठगाने व्यावसायिकाची 1 कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक प्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

लोअर परळ येथे राहणारे तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. मार्च महिन्यात त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडण्यात आले. त्यानंतर त्यांना एका महिलेने संपर्क केला. तिने एका कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवले. शेअर खरेदी-विक्री केल्यास चांगला फायदा मिळवून देतो असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना जोडण्यात आलेल्या ग्रुपवर शेअरची माहिती पोस्ट केली जायची. त्यानंतर महिलेने त्यांना एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक अॅप्स उघडले. त्या अॅप्सवर त्याने माहिती अपलोड करून लॉगिन केले. सुरुवातीला त्याने दहा हजार रुपये गुंतवले. पैसे गुंतवल्यावर त्यांना 832 रुपये नफा झाल्याचे भासवण्यात आले.