
ग्रँट रोड येथील इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत एकाचा गुदमरून मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या दोघा जवानांचा समावेश आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
ग्रँट रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळील ‘आदित्य ऑर्किड’ या पाच मजली इमारतीला सकाळी 6 वाजताच्या सुमाराला आग लागली. बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीतून काही जणांना इमारतीबाहेर पडण्यात यश आले तर काही जण आगीमुळे आत अडकून पडले. मात्र काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. इमारतीत अडकलेल्यांना लोखंडी ग्रील कापून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले, मात्र उत्तम कुमार (22) यांचा गुदमरून मृत्यू झाला. जवानांनी दिलीप चौधरी (40), अशोक चौधरी (23), भारत चौधरी (23) आणि आणखी एकाला असे चौघांना बाहेर काढले. आग विझवताना मेमनवाडा अग्निशमन केंद्राचे सुधान गोरे आणि भायखळा अग्निशमन केंद्राचे नंदकुमार वायल यांच्या डाव्या हाताला मार लागला. जखमींना जे. जे. मध्ये तर जवानांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.





























































