
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 115 पैकी 19 उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यापैकी 10 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा निष्कर्ष एडीआर-महाराष्ट्र इलेक्शन वॉच संस्थेने काढला आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपने उभे केलेले सर्व उमेदवार कोटय़धीश असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम अशा सात लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर संस्थेने विश्लेषण केले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सातपैकी दोन, काँग्रेसच्या 6 पैकी दोन उमेदवारांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार कोटय़वधीचे धनी आहेत. पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निवडणूक लढवत असलेल्या 115 पैकी 11 उमेदवारांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत घोषित केलेले नाहीत तर 48 उमेदवारांनी आयकर विवरण जाहीर केलेले नाही. तसेच काही उमेदवारांना आयकर भरावा लागत नसल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
सर्वाधिक श्रीमंत असलेले पहिले दहा उमेदवार
सुनील मेंढे-भाजप (भंडारा-गोंदिया)- 62 कोटी 75 लाख रुपये
नितीन गडकरी-भाजप (नागपूर) -18 कोटी 79 लाख रुपये
परशराम आडे-अपक्ष (यवतमाळ-वाशिम)- 18 कोटी 73 लाख रुपये
सुरेश धानोरकर-काँग्रेस (चंद्रपूर)- 13 कोटी 74 लाख रुपये
चारूलता टोकस-काँग्रेस (वर्धा)- 13 कोटी 61 लाख रुपये
शैलेशकुमार अग्रवाल-बसप (वर्धा)- 13 कोटी 51 लाख रुपये
धनराज वंजारी-वंचित आघाडी (वर्धा)- 9 कोटी 76 लाख रुपये
सुरेश माने बीआरएसपी (नागपूर)- 8 कोटी 45 लाख रुपये


























































