मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 कोटी जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संकटग्रस्त तसेच दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांना दिलासा ठरणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसेच नसल्याचं वृत्त शुक्रवारी सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं. मात्र आता, या निधीत 10 कोटींची भर पडली आहे. त्यामुळे 1500हून अधिक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

रुग्णांची वाढती संख्या आणि साखर कारखान्यांकडून मिळणारं आर्थिक साहाय्य थांबल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी संपल्याचं वृत्त शुक्रवारी दैनिक मुंबई मिररने दिलं होतं. या निधीत भर घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही प्रख्यात उद्योजकांशी भेट घेऊन सीएसआर फंडविषयी निर्णय घेणार होते. त्यानुसार या भेटीत 10 कोटींचा निधी जमा झाला आहे. या बैठकीत महिंद्रा अँड महिंद्रा, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स, भारत पेट्रोलियम, एचडीएफसी बँक आणि रोटरी क्लब यांचा समावेश होता. या उद्योजकांनी तीन कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तर उर्वरित सात कोटींची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा विनियोग करताना गंभीर आजारी असलेल्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निधीलाच पडतेय ‘सहाय्यते’ची गरज!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वैद्यकीय मदत विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी इतक्या तातडीने उद्योजकांनी अर्थसाहाय्य केल्याबद्दल आभार मानले आहेत. तसंच या मदतीचा ओघ असाच सुरू राहिल, अशी आशा करताना जर अशा प्रकारे मदत सुरू राहिली तर निधीतील आर्थिक तुटवडा भरून निघेल, अशी अपेक्षा शेटे यांनी व्यक्त केली आहे.