
सामना प्रतिनिधी । मुंबई
मतदार याद्यांमधून मृत व्यक्तीचे नाव कमी न करणे, पत्ता बदलला असल्यास आधीच्या मतदारसंघात असलेले नाव कमी न करणे, मतदार याद्यांत नोंदवलेले अपूर्ण किंवा चुकीचे पत्ते देणे तसेच दुबार नावे यामुळे फुगत चाललेल्या मतदार यात्रीला निवडणूक आयोगाने कात्री लावली आहे. निवडणूक आयोगाने राज्यभरातून अशा 9 लाख 96 हजार 838 ममतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकली आहेत. यात सांगली (71 हजार 964), नागपूर (71 हजार 461), नाशिक (70 हजार 591), धाराशीव (66 हजार 492), ठाणे (60 हजार 515), व पुणे (54 हजार 584) येथील मतदारांचा समावेश आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्या पुनर्रीक्षणाचे काम हाती घेतले आहे.
का वगळली मतदारांची नावे?
पुनर्रीक्षणादरम्यान अधिकाऱयांना अनेक मतदारांचे चुकीचे पत्ते, मतदारांचे दुसऱया ठिकाणी झालेले स्थलांतर, दुबार नावे तसेच मृत व्यक्तीचे नाव कमी केले नसल्याचे आढळून आले होते. मात्र त्याबाबत मतदारांकडून काहीच कार्यवाही न झाल्याने ही नावे मतदार यादीमधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
– 28 ऑगस्ट 2018पर्यंत हाती घेण्यात आलेल्या पुनर्रीक्षणामध्ये तब्बल 9 लाख 96 हजार 838 नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
– यात सर्वाधिक सांगली, नागपूर, नाशिक, धाराशीव, ठाणे, पुणे, जळगाव, यवतमाळ, कोल्हापूर येथील मतदारांचा समावेश आहे.
– यंदा मुंबई उपनगरातून 21 हजार 19 तर मुंबई शहरातून फक्त 6 हजार 752 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. पुनर्रीक्षणाचे काम अजूनही सुरूच राहणार असल्याने वगळण्यात येणाऱया मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

























































