
राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवणाऱया सभासद, ग्राहकांना खूशखबर आहे. यापुढे पतसंस्थांना आपल्या ग्राहकांकडून ठेवल्या जाणाऱ्या ठेवींवर 10 टक्क्यांपर्यंत घसघशीत व्याज देता येणार आहे. त्याबाबतचा निर्णय सहकार विभागाने पतसंस्था नियामक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. याआधी पतसंस्थांनी आपल्याकडे येणाऱया ठेवींवर जास्त जास्त साडेआठ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे असे सहकार विभागाचे निर्देश होते.
रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये वाढ केल्याने सरकारी बँका, सहकारी बँका आणि खासगी बँकांकडून व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे या बँकांकडून ठेवींवर दिले जाणारे व्याज आणि सहकारी पतसंस्थांमधील ठेवीवर मिळणारे व्याज अंतर कमी झाले आहे. परिणाम पतसंस्थांमधील ठेवींवरील आणि कर्जाच्या व्याजदरात वाढ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार नुकतीच सहकारी पतसंस्था नियामक मंडळाची बैठक झाली असून असन त्यामध्ये पतसंस्थांकडे येणाऱया ठेवींवर कमाल 10 टक्के व्याज द्यावे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवणाऱया सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कर्जावरील व्याजातही वाढ
सहकारी पतसंस्था नियामक मंडळाने पतसंस्थांमध्ये ठेवल्या जाणाऱया ठेवींवर दहा टक्क्यांपर्यंत वाढ करतानाच कर्जावरील व्याजामध्येही मोठी वाढ केली आहे. त्यानुसार याआधी 12 टक्क्यांपर्यंत असलेले तारण कर्जावरील व्याज 14 टक्के आणि विनातारण कर्जावर कमाल व्याज 16 टक्के एवढे केले आहे. त्यामुळे पतसंस्थांना आर्थिकदृष्टय़ा बळकटी मिळू शकणार आहे.

























































