
पालिकेच्या आपत्कालीन कक्षातील ‘1916’ क्रमांकावर ‘तौकते’ वादळाच्या 24 तासांत तब्बल 9 हजार 916 कॉल आले. यामध्ये झाड पडले, पाणी तुंबले, घर-भिंत कोसळली, लाईट गेली, खड्डा पडला अशा अनेक प्रकारच्या तक्रारी मुंबईकरांनी केल्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाला कळवून तातडीने कार्यवाही करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘तौकते’ चक्रीवादळाचा जबर फटका मुंबईला बसला. जोरदार वाऱयासह मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबई ठप्प झाली. जोरदार वाऱयासह मुसळधार पावसामुळे मुंबईत झाड पडणे, घराचा भाग कोसळणे, रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात अडकलेल्या अशा एकूण 9,817 लोकांचे मदतीसाठी सतत फोन खणखणत होते. जोरदार वारे व मुसळधार पाऊस कशातही मदतीसाठी येणारे फोन लक्षात घेता वेळीच मदत पोहोचवत संबंधितांना आवश्यक मदत करण्यात आल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.
कधीही कॉल करा, मदत मिळणार!
मुंबईकरांच्या आपत्कालीन मदतीसाठी तातडीने बचावकार्य करता यावे यासाठी आपत्कालीन विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी ‘1916’ हा टोल फ्री क्रमांक सर्वसामान्य नागरिकांसाठी तक्रारी दाखल करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी 24 तास पालिकेचे कर्मचारी उपलब्ध असतात. या ठिकाणी कॉल केल्यावर संबंधित विभाग, अग्निशमन दल यासह त्या त्या प्रशासनाशी समन्वय साधून मदत केली जाते. कोविड काळात या क्रमांकावरून मदत, मार्गदर्शन अशी कामेही करण्यात आली.

























































