
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, चिमुकल्यांनी मात्र कोरोनाशी दोन हात केले आहेत. गेल्या 100 दिवसांत 32 बालकांनी कोरोनावर मात केली असल्याने कोरोनाविरुद्ध लढा देणाऱया कोविड योद्धय़ांचे मनोबल वाढणार आहे.
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीतील एका सहा महिन्यांच्या बालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याने कोरोनावर यशस्वी मात केली होती. काही दिवसांपूर्वी दोन नवजात बालकांसह त्यांच्या मातांना कोरोनाची बाधा झाली होती. जन्माला आल्यावर सात दिवसांनंतर त्या बालकांचा स्वॅब तपासल्यावर ती बालके कोरोनाबाधित असल्याचे आढळले. 10 दिवसांच्या उपचारांनंतर त्या दोन्ही बालकांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी त्या बालकांना त्यांच्या आईसह जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी सांगितले की, कोरोनाबाधित बालकांना आईचे दूध अमृत ठरले आहे. आईच्या दुधामुळेच बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. तसेच योग्य वेळी लसीकरण केल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढली. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 109 बालके कोरोना तपासणीसाठी आली होती. त्यांपैकी 34 बालके कोरोनाबाधित सापडली. जिह्यात आता बालमृत्यूचा दर शून्य आहे.



























































