
कोरोनामुळे मागील दोन वर्षे पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून 25 टक्के भाग वगळला होता. बोर्डाच्या तसेच पहिली ते नववीच्या परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर घेतल्या होत्या, मात्र शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद होत्या. अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू होते, मात्र अपुऱया इंटरनेट सुविधा आणि नेटवर्किंगच्या समस्येमुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचले नाही. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली होती.

























































