रोहितचं अनोखं ‘शतक’, गावस्कर, कपिलदेव यांच्या पंक्तीत स्थान

6971

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दुसरा टी-20 सामना राजकोट येथे सुरू आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’ आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टॉससाठी मैदानावर उतरताच त्याच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

राजकोट येथे सुरू असणारा टी-20 सामना रोहितचा 100 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. टीम इंडियाकडून 100 आंतरराष्ट्रीय टी-20 लढती खेळणारा रोहित पहिला, तर वर्ल्ड क्रिकेटमधील दुसरा खेळाडू आहे. यासह रोहतने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. टीम इंडियाकडून 100 कसोटी खेळण्याचा पहिला बहुमान सुनील गावस्कर (1984) आणि 100 एक दिवसीय सामने खेळण्याचा पहिला बहुमान कपिल देव यांनी मिळवला होता. आता या क्लबमध्ये रोहितच्या नावाचा समावेश झाला आहे.

दरम्यान, टी-20 क्रिकेटच्या विक्रमांवर नजर टाकली असता 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणारा पहिला खेळाडू म्हणून पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याच्या नावाची नोंद आहे. शोएब मलिकने 111 आंतरराष्ट्रीय टी-20 लढती खेळल्या आहेत. आता या क्लबमध्ये रोहित शर्माचे नाव जोडले गेले आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी-20 लढतींमध्ये 2452 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. दुसऱ्या स्थानावर विराट कोहली असून त्याने 72 लढतीत 2450 धावा चोपल्या आहेत. राजकोट टी-20 मध्ये हे अंतर वाढवण्याची संधी रोहितकडे असणार आहे. यासह रोहितच्या नावावर 106 सिक्स आणि सर्वाधिक चार शतकांचीही नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या