100 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याची नोटीस, भाजपचे हिंदुत्व पहा कसे बेगडी; आदित्य ठाकरे यांचा ठिय्या

‘आम्हीच हिंदुत्वाचे कैवारी’ असल्याच्या बढाया मारत हिंदुत्वाशी वारंवार प्रतारणा करणाऱ्या भाजप-मिंधे सरकारने आता आर्थर रोडवरील 100 वर्षे जुने श्री लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका-बिल्डरच्या तुघलकी कारभाराविरोधात मंदिरातच ठिय्या मांडला. हिंदूंचे श्रद्धास्थान असणारे मंदिर तोडू नये असे बजावत बिल्डर आणि पालिकेची दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा दिला.

आर्थर रोड नाका येथील महानगरपालिका कर्मचारी वसाहत परिसरात हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे. या वसाहतीमध्ये मेघवाल समाजबांधव बहुसंख्य आहेत. इथला लक्ष्मीनारायण केवळ या वसाहतीतील रहिवासीच नव्हे तर मुंबईकरांचे श्रद्धास्थान आहे. मात्र वसाहतीच्या पुनर्विकासात बिल्डरच्या फायद्यासाठी महापालिका या मंदिरावरही हाथोडा घालायला निघाली आहे. महापालिकेने मंदिर तोडण्याची नोटीस बजावली असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या मंदिराला आदित्य ठाकरे यांनी भेट दिली व लक्ष्मी नारायण मंदिराच्या सदस्यांसोबत संवाद साधला. या ठिकाणचे मंदिर इमारत बांधकामात अडथळा ठरत नसतानाही शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे मंदिर तोडण्यासाठी नोटीस का बजावली असा सवाल करतानाच या मंदिराला हात लावू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले. यावेळी शिवसेना आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडये, सुनील अहिर उपस्थित होते.

…तर बिल्डरला एकही इमारत बांधू देणार नाही!
मंदिर वाचवण्यासाठी आम्ही सदैव समितीच्या पाठीशी असून मंदिराला कुणी हात लावला तर बिल्डरला विक्रीच्या घरांची एकही इमारत बांधू देणार नाही आणि त्याला मुंबईत कुठेही काम करू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.


भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे व सर्वच धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला आहे. दुसऱ्यांना हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणाऱ्या भाजपच्या राज्यात मंदिरांना नोटीस का जातात? – आदित्य ठाकरे