
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल कश्मीर दौऱ्याहून नवी दिल्लीत परतल्यावर कश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे अतिरिक्त 10 हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही जवानांना हेलिकॉप्टरने कश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहे. कश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी सुरू असलेली मोहिम अधिक गतिमान करण्यासाठी अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह मंत्रालयाकडून सांगण्य़ात आले. त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही या जवानांची मदत होणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने 25 जुलैला याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे. ‘केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कश्मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची कोणतीही कमतरता नाही. आता अधिक कुमक पाठवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे’, असे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. कश्मीर समस्या चर्चेने सोडवता येऊ शकते. त्यामुळे केंद्राने या निर्णयाबाबत पुनर्विचार करून धोरण बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
Centre’s decision to deploy additional 10,000 troops to the valley has created fear psychosis amongst people. There is no dearth of security forces in Kashmir. J&K is a political problem which won’t be solved by military means. GOI needs to rethink & overhaul its policy.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) July 27, 2019
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सुरक्षा दलाच्या जवानांना हेलिकॉप्टरने कश्मीरमध्ये पोहचवण्यात येत आहे. कश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक तुकडीत 100 जवान असतील असे जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. सुरक्षा दलाच्या या तुकड्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि हिंदुस्थान- तिबेट सीमा सुरक्षा पोलीस दलातील जवानांचा समावेश आहे.
अजित डोवाल बुधवारी श्रीनगरला गेले होते. त्यांनी सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत दिल्लीतील गुप्तचर यंत्रणाचे अधिकारीही होते. डोवाल यांच्या कश्मीर दौऱ्यानंतर तेथे अतिरिक्त 10 हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू कश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट असून 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या कश्मीरमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी 40 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

























































