1001 रुग्णांवर होणार सेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया

418

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरातील 1001 गरीब रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी देण्याचा संकल्प माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोडला होता. यानुसार जे. जे. रुग्णालयात 250 रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना सेको लेन्स बसविण्यात आलीयातील 125 रुग्णांना आज डॉ. दीपक सावंत तसेच  राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत  चष्म्याचे वाटप करण्यात आले.

डॉ. दीपक सावंत यांनी सोडलेल्या संकल्पानुसार वर्षभरात 1001 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सेको लेन्सने शस्त्रक्रिया करण्यासाठी 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मात्र या रुग्णांच्या खर्चाची जबाबदारी डॉ. सावंत यांनी घेतली आहे. कर्जत येथील 250 रुग्णांवर डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखालील चमूने सेको लेन्सने या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. जे. जे. रुग्णालयात या रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले त्यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. शिवसेना म्हणजे समाजकारणाचा उत्तम पायंडा घालून दिला आहे. यामुळेच गरीब जनतेलाही या पक्षाचा आसरा वाटतो, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाने दिली.

यावेळी नेत्रशल्यविशारद डॉ. रागिणी पारेख यांच्यासह जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ. संजय सुरासे, कर्जतचे नेत्रतज्ञ पवार आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या