
नाटय़पंढरी सांगलीमध्ये 100वे नाटय़ संमेलन करण्याचा निर्णय 2019मध्ये नाटय़ परिषदेने घेतला होता. मात्र, कोविडमुळे तो लांबला. आता तर नाटय़पंढरी सांगलीला डावलून हा सोहळा राजधानी मुंबईत करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे नाटय़पंढरी सांगलीतील कलारसिक नाराज झाले आहेत.
अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी डिसेंबर 2019मध्ये 100वे नाटय़ संमेलन नाटय़पंढरी सांगलीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. तंजावरसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात कार्यक्रमाचे नियोजन केले होते आणि मुख्य सोहळा सांगलीत निश्चित केला होता. मात्र, कोरोना साथीमुळे गेली तीन वर्षे हे नाटय़ संमेलन पुढे ढकलण्यात आले. मात्र, परवा मुंबईत नाटय़ परिषदेचे नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत 100व्या नाटय़ संमेलनाचा मुख्य सोहळा मुंबईसारख्या मध्यवर्ती शहरात व्हावा, अशी सूचना नाटय़ परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पवार यांची सूचना परिषदेकडून डावलली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे 100व्या नाटय़ संमेलनाची नाटय़पंढरी सांगलीची संधी हुकण्याची चिन्हे आहेत.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीनंतर प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली नियामक मंडळ सत्तेत आले आहे. 100व्या नाटय़ संमेलनाला साजेसे कार्यक्रम मुंबईत घेता येऊ शकतील, असे सर्वांचे मत झाले आहे. त्यामुळे नाटय़पंढरी सांगलीचा विचार होणार नाही. सांगलीची बाजताकदीने मांडणारा नाटय़ परिषदेत कोणी सांगलीकरही नाही. पुढील वर्षी मार्चमध्ये हे 100वे नाटय़ संमेलन घेण्याचे नियोजन आहे. कोरोनापूर्वीच्या काळात झालेल्या निवडीनुसार डॉ. जब्बार पटेल हेच या नाटय़ संमेलनाचे अध्यक्षस्थानी असतील आणि संमेलनाची रूपरेषा आखण्यासाठी समन्वय समिती लवकर स्थापन केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीची एक ऐतिहासिक संधी हुकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाटय़पंढरीतील कलावंत, रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.



























































