
जिंतूर शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर पायी तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून किंवा इतर वाहनाने घराकडे निघालेल्या सुमारे 130 हून अधिक मजुरांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्यांना अकोली येथील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 81 मजुरांचे क्वारंटाईनमधील 14 दिवस पूर्ण झाल्याने त्यांना 27 एप्रिल रोजी 22 क्वारंटाईन ग्रामस्थांना शासनाने खासगी बसद्वारे त्यांच्या गावी रवाना केले.
कोरोनामुळे सरकारने देशात लॉकडाऊन जारी केला होता. परिणामी ऊसतोडी व इतर मजुरी कामासाठी आपले घरदार सोडून गेलेल्या मजुरांवर मजुरीविना उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याने बहुसंख्य मजूरांचे घोळके पायी तसेच मिळेल त्या वाहनांद्वारे आपल्या गावी निघाले होते. मात्र जिंतूर शहरातून जात असतांना खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने अकोली येथील अनुसूचित जाती जमाती मुलांच्या वसतिगृहात सुमारे 130 मजुरांना 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आले होते.
सलग 14 दिवस त्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासन आणि मुस्लिम काली मस्जिद कमेटी तर्फे मजुरांच्या साठी सकाळी वसतीगृहात जाऊन जागेवरच जेवण, अल्पोपहार तसेच मोबाईल रिचार्ज, अंघोळींसाठी साबण, कपडे धुण्यासाठी साबन व इतर बाबींची व्यस्था केली. रविवारी, सोमवारी 130 पैकी 81 व 22 मजुरांच्या क्वारंटाईनमधील दिवस पूर्ण झाल्याने तलाठी नितीन बुडडे, धनंजय सोनुने व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाजगी बसद्वारे स्वगृही रवाना केले. यावेळी क्वारंटाईनमधील महिला, बालक, तरुण, वयोवृद्ध मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती.
तीन जिल्ह्यातील मजुरांचा समावेश अकोली येथील अनुसूचित जाती जमाती मुलांच्या वसतिगृहात क्वारंटाईनमधून मायदेशी पाठवण्यात आलेल्या मजुरांमध्ये हिंगोली येथील 32, नांदेड येथील 27 तसेच यवतमाळ येथील 22 अशा तीन जिल्ह्यातील 81 मजुरांचा समावेश असुन प्रत्येक जिल्ह्यातील मजुरांना वेगवेगळ्या बसमधून पाठविण्यात आले आहे. तर शहरातील 22 मजूरांना पण वाहनाने घरापर्यंत सोडण्यात आले असून अजून पण आंध्रप्रदेश व इतर ठिकाणचे 20 पेक्षा अधिक कोरोनटाईनग्रस्त असल्याची माहिती तलाठी नितीन बुड्डे व ग्रामसेवक विजय बोधले यांनी दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलताना दिली.



























































