
यावर्षी गळीत हंगाम घेतलेल्या एकूण 190 साखर कारखान्यांपैकी 103 कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीची 100 टक्के रक्कम शेतकऱयांना अदा केली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील एकूण 22 पैकी 12 साखर कारखान्यांचा समावेश आहे.
साखर आयुक्तालयाने केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, साखर संचालनालयाचे मुख्य संचालक (साखर) यांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील 190 साखर करखान्यांनी हंगाम घेतला. त्यापैकी आजअखेर 187 कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. 20 मे 2021 अखेर राज्यात 1012.29 लाख मेट्रिक टस उसाचे गाळप झाले. 25 मे रोजी पहिल्या पंधरवड्याअखेर गाळप झालेल्या उसाची एकूण एफआरपीची रक्कम 22 हजार 888 कोटी होते. त्यापैकी 21 हजार 454 कोटी एफआरपीची रक्कम शेतकऱयांना अदा करण्यात आली आहे. एफआरपी अदा करण्याचे हे प्रमाण 93.63 टक्के आहे. तसेच, 1 हजार 458 कोटी रुपयांची (6.37 टक्के) एफआरपी थकीत आहे.
राज्यातील 103 साखर कारखान्यांनी 100 टक्क्यांपेक्षा अधिक, 81 कारखान्यांनी 50 ते 99 टक्के, चार कारखान्यांनी एक ते 49 टक्के, तर दोन कारखान्यांनी शून्य टक्के एफआरपी अदा केली आहे. अद्यापि 452 कोटींची एफआरपीची रक्कम अदा न करणाऱया 19 साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाने आरसीसीची कारवाई केली आहे. मागील गळीत हंगाम 2019-20 मधील गळीत उसाची 321.46 कोटींची एफआरपी थकीत आहे.
100 टक्के एफआरपी देणारे नगरमधील कारखाने
लोकनेते मारुतराव घुले-पाटील (भेंडे), मुळा (सोनई), गणेश (राहाता), नागवडे (श्रीगोंदे), संगमनेर (भाग), संजीवनी (कोल्हे), कोपरगाव (काळे), प्रसाद शुगर (राहुरी), केदारेश्वर, साईकृपा -1, अंबालिका, श्री क्रांती शुगर.
100 टक्केपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने
बी. बी. तनपुरे (53 ), कुकडी (62), अशोक (78), गंगामाई (88), पीयूष (90), वृद्धेश्वर (93), विखे-पाटील (94), जय श्रीराम (94), यूटेक (95), अगस्ती (99).



























































