104 सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’, 50 जण तडीपार; परिमंडळ चारमध्ये कारवाईचा धडाका

खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि संघटित गुन्हे करणार्‍या परिमंडळ चारमधील तब्बल 104 गुन्हेगारांवर चालु वर्षात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. तर, 50 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून 15 गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी ही माहिती दिली.

पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारमध्ये येरवडा, खडकी, विश्रांतवाडी, विमानतळ, चतुःश्रुंगी, चंदननगर आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील सराईत गुन्हेगार, टोळ्या आणि नवोदीत भाईंवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आजवर एकूण साठ पेक्षा अधिक टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ चारमधील 12 टोळ्यांचा समावेश आहे. परिमंडळ चारमधील पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील आणि सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणार्‍या टोळ्यांवर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का, तडीपारी आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. त्यानूसार 12 टोळ्यांधील 104 गुन्हेगारांवर मोक्का लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. तर, 50 जणांना तडीपार करण्यात आले असून 15 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. चारमधील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यांतर्गत 28, खडकी 41, विश्रांतवाडी 6, येरवडा 20, विमानतळ 6 आणि लोणीकंद पोलीस ठाण्यातील 3 अशा एकूण 104 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 18 व चतुःश्रुंगी पोलिसांच्या हद्दीतून 10 आणि इतर पोलीस ठाणे असे मिळून 50 जणांना पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, या भागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.

परिमंडळ चार अंतर्गत येणार्‍या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणार्‍यांवर मोक्का, तडीपारी आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. त्यानूसार यंदा चालु वर्षात 104 जणांवर मोक्का तर पन्नास जणांना तडीपार करण्यात आले आहे.
– शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

…जबरी चोरीच्या घटना सर्वाधिक
परिमंडळ चारमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया सुरू असल्या तरी यंदा जबरी चोरीच्या घटना सर्वाधिक घडलेल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्टअखेर म्हणजेच मागील आठ महिन्यात पुणे पोलीस आयुक्तालयात जबरी चोरीचे 253 गुन्हे दाखल आहेत. यात सर्वाधिक 77 गुन्हे हे परिमंडळ चारमध्ये दाखल झाले असून विशेषतः येरवडा, विमानतळ या भागात जबरी चोरीच्या घटनांचा आलेख जास्त आहे. मागील आठवडाभरात तीन ते चार घटना समोर आल्या आहेत.