दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा या आठवड्यात जाहीर होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school-exam

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षांच्या अधिकृत तारखांची घोषणा याच आठवडय़ात करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया दहावी, बारावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे 40 ते 45 दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ‘विद्यार्थी पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहीत झाल्यास परीक्षेची तयारी करण्यास वेळ मिळेल,’ असे पाटील यांनी सांगितले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या फेरपरीक्षांचे आयोजन शिक्षण मंडळाने चोख पार पडले. दोन आठवडय़ांत या परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले त्याचप्रमाणे शिक्षण मंडळ नियमित परीक्षांचेही सुरक्षेसंदर्भात खबरदारी घेऊन आयोजन करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ प्रवेशाची आज पहिली फेरी

मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 13 जानेवारीपासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी’ राबविण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपर्यंत गुण मिळालेले विद्यार्थी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

प्रवेश अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘proceed for admission’ वर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी 13 जानेवारी सकाळी 10 ते 15 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर 15 जानेवारीला रात्री 8 वाजेपर्यंत महाविद्यालयांना अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.