
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एमएससीईआरटी) दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा मिळणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 426 तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. त्यातून अभ्यास न झाल्याने विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता अधिक असते. यंदा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे तसेच ऑनलाइन शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवरील तणाव कमी व्हावा व त्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने योग्य मागदर्शन मिळावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबईत सर्वाधिक समुपदेशक
मुंबईमध्ये सर्वाधिक 83 समुपदेशकांची नियुक्ती केली असून, त्याखालोखाल पुणे 46, ठाणे 30, कोल्हापूर 26, रत्नागिरी 25, सातारा 20, नाशिक 18, नगर 13, रायगड 12, संभाजीनगर 12, अमरावती 11, नागपूर 8 असे सर्व जिह्यांमध्ये समुपदेशक नेमले आहेत. या समुपदेशकांची जिल्हानिहाय यादी, त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.





























































