
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आणि शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला विषयातील सवलतीचे गुण मिळविण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाने दिलासा दिला आहे. सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास बोर्डाने मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थी 15 फेब्रुवारीपर्यंत आपले प्रस्ताव शाळेकडे सादर करू शकतात. यापूर्वी ही मुदत 15 जानेवारीपर्यंत देण्यात आली होती.
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे या परीक्षांना बसलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला कोट्यातील वाढीव गुणांपासून वंचित राहावे लागणार होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा सप्टेंबरऐवजी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आल्या होत्या. परीक्षांनाच उशीर झाल्याने साहजिकच निकालालाही उशीर झाला आहे. मुंबई मुख्याध्यापक संघटनेनेही कलागुणांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी बोर्डाकडे केली होती.
































































