दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश का झाली? दोन महिन्यांनंतरही चौकशी समितीचा अहवाल गुलदस्त्यातच

दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश का झाली याचे उत्तर अद्याप विद्यार्थी, पालकांना मिळालेले नाही. दहावीच्या निकालाच्या दिवशी बोर्डाची वेबसाईट हॅंग झाली होती. दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. मात्र अवघ्या तासाभरात वेबसाईटवर तांत्रिक समस्या उद्भवल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. सायंकाळी 7 वाजेपर्यंत वेबसाईट पूर्ववत झाली नाही. या गोंधळाची चौकशी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने 15 दिवसांत अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र आता दोन महिने झाले तरी अहवाल गुलदस्त्यातच आहे.

निकालाची वेबसाईट हॅँग झाल्याप्रकरणी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीत सूचना आणि तांत्रिक विभागाचे सचिव, उद्योग, ऊर्जा आणि संरक्षणावरील विभाग उपसचिव, शिक्षण विभाग तांत्रिक सल्लागार, पुणे शिक्षण मंडळाचे उपसंचालक यांचा समावेश होता. निकालाच्या आधी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला होता का? निकालाच्या आधी राज्य मंडळाने संबंधित सल्लागारांना याची पूर्वसूचना दिली होती का? वेबसाईटचे काम करणाऱया कंपनीला निकाल जाहीर करण्याच्या तारखेविषयी माहिती होती? भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सूचना, यात चूक कोणाची याचा शोध घेण्याची जबाबदारी या समितीची होती. मात्र अद्यापपर्यंत या समितीने कोणताही अहवाल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठविलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या