
जालना जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. यामुळे शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. निसर्गाचा प्रचंड कोप झाल्याने होत्याचे नव्हते केले आहे. जालना जिल्ह्यातील जालना अंबड, घनसावंगी, मंठा, परतुर, जाफराबाद, भोकरदन बदनापूर तालुक्यात चार दिवसांत प्रचंड गारपीट, वादळाचा तडाका यामुळे लाखोंचे नुकसान होऊन शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.
आज 28 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागात विजा कोसळून तब्बल 11 जनावरे दगावली आहेत. तर काही ठिकाणी मोसंबीच्या बागा पडल्या आहेत. आंबा तर पुर्णत: नायनाट झाला आहे. या निसर्गाच्या या कोपामुळे शेतकरी भुईसपाट झाला आहे. आज दिवसभरात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ठिकाणी गारांचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी लग्न समारंभातील मंडप उडून गेले आहेत. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. पावसाचा जोर अधिक असल्याने पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण होवून पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहत होते. तर काही रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक खोळंबली होती.
कुलाबा येथील हवामान शास्त्र विभागाच्या सूचनेनूसार आज शुक्रवारी 28 एप्रिल रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानूसार आज दुपारनंतर जालना शहरासह बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा तालुक्यात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, वडीगोद्री परीसरासह भोकरदन तालुक्यातील धावडा परीसरात वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला असून आज ठिकठिकाणी विजा कोसळून अकरा जनावरे दगावल्याची घटना घडली. याशिवाय पिकेही उद्ध्वस्त झाली. एकुणच शेतकर्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे.
अंबड तालुक्यात 7 जनावरे तर बदनापूर, भोकरदन प्रत्येकी एक अशा प्रकारे एकुण 9 जनावरांवर विज कोसळल्याने ठार झाले आहेत. विज कोसळल्याने पशुपालकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात वादळ अधिक असल्याने मोसंबी, डाळींब, आंब्याचे गळून पडले आहेत. तर काही ठिकाणी मोसंबीचे झाडे उन्मळून पडली आहेत. पावसासोबत वार्याचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी पाणी वाहत होते.



























































