मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकी होणार,‘ट्राय’ने मागविली ग्राहकांची मते

वाढत्या लोकसंख्येबरोबरच नवीन मोबाईल कनेक्शनची मागणीदेखील वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकी करण्याचा विचार भारतीय दूरसंचार निगम (ट्राय) करीत आहे. मोबाईल क्रमांक बदलाचा निर्णय घेण्यापूर्वी ट्रायने ग्राहकांची याविषयीची मते जाणून घेण्याचा निर्णय असून येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र सरकारने ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आणि ‘मशीन टू मशीन’ संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येणारे क्रमांक यापूर्वीच 13 अंकी केले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2027 पर्यंत हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकणार असून 160 कोटी लोकसंख्येचा उच्चांक गाठत हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे. वाढणाऱया लोकसंख्येमुळे मोबाईल कनेक्शनची मागणीही वाढत आहे. सध्या देशात 120 कोटी मोबाईल कनेक्शन वापरात आहेत.

2050 पर्यंत 260 कोटी मोबाईल क्रमांकाची आवश्यकता
ट्रायनुसार 2050 पर्यंत हिंदुस्थानात मोबाईल क्रमांकाच्या गरजा भागविण्यासाठी तब्बल 260 कोटी मोबाईल क्रमांकाची गरज भासणार आहे. 2050 मध्ये वायरलेस मोबाईल फोनची घनता 200 टक्क्यांनी वाढणार असून सुमारे 328 कोटी नव्या मोबाईल क्रमांकाची आवश्यकता भासणार आहे.
ट्रायची वेबसाईट www.trai.gov.in या संबंधीच्या लेखी सूचना उपलब्ध असून ग्राहकांनी या सूचनेत दिलेल्या ईमेल आयडीवर 21 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना पाठवायच्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या