अहमदपूर तालुक्यात आढळला 11फुटी अजगर

अहमदपूर तालुक्यातील गुट्टेवाडी येथे शिवहार सोपान गुट्टे यांच्या शेतात जाळीमध्ये अजगर आढळला. त्याचे वजन अंदाजे 30 किलो असून त्याची लांबी 11 फूट आहे. जाळीत अजगर असल्याचे समजताच सर्पमित्र अमोल शिरूरकर, सूदर्शन पाटील, नागेश वरवटे, गोरख खेडकर,सिद्धार्थ काळे यांना बोलावण्यात आले. त्यांनी अथक परिश्रणाने अजगर पकडला.

अजगर अहमदपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला असून वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत सर्पमित्र शिरूरकर ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून वन्यजीव वाचवण्याचे काम करतात. अजगर हा साप बिनविषारी असून सापाबद्दल समाजात खूप गैरसमज आहेत. आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु आढळल्यास न मारता सर्पमित्राला संपर्क करा, असे अहवान सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी केले.