11 वर्षीय केदारच्या मृत्यूने माथेरानकर हळहळले, ब्लड कॅन्सरशी झुंज अपयशी

मोठा क्रिकेटर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या येथील 11 वर्षीय केदारच्या अकाली मृत्यूने माथेरानकर हळहळले. गेले सहा महिने केदारवर खारघर येथील टाटा रुग्णालयात कॅन्सरवरील उपचार सुरू होते. मात्र ब्लड कॅन्सरशी त्याची झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला.

घराची हलाखीची परिस्थिती. वडील अपंग, आई स्टॉल चालवून संसाराचा गाडा हाकत होती. एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघेच लेकरे. माथेरान येथील हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिरमध्ये सहावी इयत्तेत शिकणाऱ्या केदारला वयाच्या दहाव्या वर्षी ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकीकडे परिस्थितीशी समझोता करीत दुसरीकडे मुलाचा आजार दूर करण्यासाठी सुरू असलेली माऊलीची धडपड सुरू होती. समाजातील दानशूरांनीदेखील साथ दिली. गेले सहा महिने खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.