उरण शहरात 112 धोकादायक इमारती

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

पावसाळ्यात जीर्ण झालेली इमारत, घर पडून जिवीतहानी आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी उरण नगरपालिकेने आपल्या परिसरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात उरण शहरातील 112 धोकादायक इमारती असल्याचे आढळून आले आहे. शहरातील धोकादायक इमारतींना उरण नगरपालिकेने नोटीसा बजावल्याचे उरण नगर पालिकेचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी सांगितले.

उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी सांगितले की, पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारती पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशा दुर्घटना उरण शहरात घडू नये यासाठी यावर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्याना दिले असून त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये उरण शहरात 112 इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. अशा धोकादायक इमारती पावसाळ्यात पडून जीवितहानी होऊ शकते. याचे गांभीर्य ओळखून उरण नगर पालिकेनी संबंधीत इमारत, घर मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उरण नगरपालिका हद्दीतील रहिवाशांनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना सहकार्य करावे. तसेच मोडकळीस आलेल्या इमारती, घरांमधून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी इमारत रिकामी करावी, असे आवाहन मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी केले आहे.