मुंबईत 117 झाडे, 39 ठिकाणी शॉर्टसर्किट, 9 ठिकाणी घर पडल्याच्या घटना 

434

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईत झालेल्या जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 117 ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या, 39 ठिकाणी शॉर्टसर्किट तर 9 ठिकाणी घर पडल्याच्या आणि घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले होते. त्याचबरोबर मुंबईभर खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. पाणी साचणार्‍या संभाव्य 300 ठिकाणी पंप बसवण्यात आले होते. धोकादायक झाडे, फांद्या पडल्यास तातडीने कार्यवाही करता यावी यासाठी प्रत्येक विभागामध्ये चार याप्रमाणे 96 पथके तैनात ठेवण्यात आली होती. शिवाय वादळ, पाण्यात गाड्या अडकल्यास टोइंग करण्याची व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात आली होती. निसर्ग चक्रीवादळ सुरू झाल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. मुंबईतील कोणत्याच भागात पाणी साचले नाही तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, शहरात 39 ठिकाणी, पूर्व उपनगरात 40 तर पश्चिम उपनगरात 38 ठिकाणी अशा एकूण 117 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. पालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी हे अडथळे तात्काळ दूर केले. शहरात 19 ठिकाणी तर उपनगरात 20 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. त्यात कोणीही जखमी झाले नाही तर मुंबईत तीन ठिकाणी, पूर्व उपनगरात दोन तर पश्चिम उपनगरात 4 ठिकाणी घर पडल्याच्या आणि भिंतीला तडे गेल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही.

35 पालिका शाळांमध्ये तात्पुरते निवारे

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि उपनगरातील समुद्र किनाऱ्याजवळील असणाऱ्या रहिवाशांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या 35 शाळांमध्ये तात्पुरते निवारे उभारण्यात आले होते. त्यात 18 हजार 887 रहिवाशांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. उद्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्यांचे स्क्रिनिंग केल्यानंतर ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना कोरोना सेंटर-2 मध्ये पाठवण्यात येईल आणि ज्यांना लक्षणे नसतील, त्यांना घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

पालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि ठिकठिकाणी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱयांसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला. आयुक्तांनी सर्वप्रथम ऍनी बेझंट मार्गावरील लव्‍हग्रोव्‍ह उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) येथील मोठ्या नाल्याची व लगतच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर खान अब्दुल गफारखान मार्गावरील वरळी सी फेस परिसराची पाहणी केली. डॉक्टर इ. मोझेस मार्गावर असणार्‍या नेहरू विज्ञान केंद्र येथे संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्या लगतच्या नागरिकांच्या निवाऱ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील निवारा केंद्राला आयुक्तांनी भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या जेवणासह तिथे करण्यात आलेल्या सुविधेबाबत विचारपूस केली.

वांद्रे कुर्ला संकुल परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘बीकेसी कनेक्ट’ या पुलालगतच्या परिसरातून वाहणार्‍या मिठी नदीची त्‍यांनी पाहणी केली.‌ या ठिकाणी महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या पावसाळापूर्व साफसफाई कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संभाव्‍य चक्रीवादळाचा तडाखा बसण्‍याची शक्‍यता असणार्‍या वेसावे समुद्र किनार्‍यास (वर्सोवा बीच) महापालिका आयुक्‍तांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जुहू परिसरातील ऋतंभरा महाविद्यालयात वेसावे गावातील सुमारे 305 नागरिकांची राहण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या महाविद्यालयाला देखील महापालिका आयुक्‍त चहल यांनी भेट दिली व तिथे असणार्‍या नागरिकांशी संवाद साधला. अंतिम टप्‍प्‍यात ‘के पश्चिम’ विभागातील इर्ला उदंचन केंद्राची (पंपिंग स्‍टेशन) पाहणी महापालिका आयुक्‍तांनी केली. या पाहणी दौऱयाला अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, संबंधित सहआयुक्त /उपायुक्त, संबंधित सहाय्यक आयुक्त व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या