
शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अकरावी प्रवेशासाठी आयोजित केलेल्या सीईटी परीक्षा शुल्काचा परतावा विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना 143 रुपयेप्रमाणे परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या सीईटी परीक्षेचे शुल्क घेण्यात आले नव्हते. मात्र बिगर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून 178 रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आले होते. राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर 2 हजार 752 तर अकरावी सीईटी परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर 41 हजार 582 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केले होते. या सर्व विद्यार्थ्यांना 143 रुपयेप्रमाणे फीचे पैसे परत केले जाणार आहेत.





























































