
सामना प्रतिनीधी । अंबरनाथ
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील कानसई गाव, मोरीवली पाडा, मोरीवली गाव,जांभीवली, जावसई, ठाकूरपाडा, फणसीपाडा, चिखलोली ठाकूरवाडी, वांद्रे पाडा, अंबरनाथ गाव, अंबरनाथ पाडा, पालेगाव या १२ गावांना लवकरच गावठाणांचा दर्जा मिळणार आहे. तसे आदेशच मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले असून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या गावांचा कायापालट होणार असून ती विकासाच्या दिशेने झेपावणार आहे.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील अशा १२ गावांना गावठाणांचा दर्जा मिळला नव्हता. त्याचा परिणाम विकासावर होत होता. त्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रस्ताव दिला होता. त्याची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तो प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. त्यावर त्यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर नगरविकास विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले असून त्यानुसार भूमापन नकाशे, कागदपत्रे आणि गुणवत्ता तपासून कलम ३७ अन्वये कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अहवालानंतर याबाबत नगरविकास विभागाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे.
विकासाला चालना मिळणार
सध्या अंबरनाथ शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यात अनेक गृहसंकुले उभी राहत आहेत. गावठाणाचा दर्जा मिळाल्यास या गावांच्या आसपासच्या ५०० मीटरच्या परीघाच्या आतील बांधकामांना दोन चटई निर्देशांक मिळणार आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळण्याची आशा आहे. त्यामुळे हा गावठाण दर्जा शहरासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितले.
































































