
सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील विजापूर येथे आज 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षा कर्मचाऱयांचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी मोहीम राबवत असताना दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी 9 वाजता चकमक सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली. या कारवाईत तीन जिह्यांतील राज्य पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट गार्ड (डीआरजी), कोब्राच्या पाच बटालियन आणि सीआरपीएफच्या 229 बटालियनचा सहभाग होता.
या महिन्यात आतापर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलांना यश आले. अलीकडेच 12 जानेवारी रोजी विजापूर जिह्यातील मोडेड पोलीस स्थानकाच्या परिसरात सुरक्षा कर्मचाऱयांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह पाच माओवादी ठार झाले. गतवर्षी छत्तीसगडमधील वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी 219 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.