रेसलिंगच्या नावाखाली 14 वर्षांच्या मुलाने केला 11 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार, प्रसुतीनंतर उघडकीस आले सत्य

12 वर्षांच्या एका मुलीला पोटात दुखायला लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दाखल केल्याच्या काही तासातच तिची प्रसुती करण्यात आली. इतक्या लहान मुलीने बाळाला जन्म दिल्याने इंग्लंडमध्ये खळबळ उडाली . या मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर आणखी एक धक्कादायक सत्य उजेडात आलं. या मुलीवर तिच्या मोठ्या भावाने बलात्कार केला होता. ही मुलगी 11 वर्षांची असताना हा प्रकार घडल्याचं त्याने सांगितलं आहे. तेव्हा या मुलाचं वय 14 वर्ष इतकं होतं.

इंग्लंडमधील स्वानसी क्राऊन कोर्टासमोर मुलीच्या भावाविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या भावंडांवर त्यांच्या आईवडिलांचे अजिबात नियंत्रण नव्हते. गोष्टी लपवून ठेवणे, खोटं बोलणे या त्यांच्या स्वभावामुळे कुटुंबात शरीर संबंधांच्या समाजरेषा पुसट झाल्या होत्या. पीडित मुलीला न्यायाधीशांनी या घटनेबाबत विचारलं तेव्हा तिने आपल्यासोबत काय झालं, हे आपल्याला माहितीच नसल्याचं सांगितलं. आपण गर्भवती आहोत हे देखील त्या मुलीला कळालं नव्हतं. पोलिसांनी जेव्हा तिच्या भावाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं त्यांचे आईवडील बाहेर गेलेले असताना तो बहिणीसोबत रेसलिंग खेळत होता. आपण पलंगावर जाऊन रेसलिंग खेळू असं म्हणून तो तिच्यासोबत पलंगावर जाऊन झोपला होता. यानंतर आम्ही शरीरसंबंध प्रस्थापित केले असं त्याने पोलिसांना सांगितलं.

या सगळ्या प्रकारानंतर पीडित मुलीने आपल्याला आता घरी जायचं नसून आपल्याला सामान्य आयुष्य जगायचं असल्याचं सांगितलं आहे. तिचा भाऊ हा त्याला दत्तक घेतलेल्या पालकांसोबत राहात असून त्याच्या नव्या आईवडिलांमुळे त्याच्या स्वभावात बराच फरक पडला असल्याचं दिसून आल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायालयाने या मुलाला तुरुंगवासाची शिक्षा देण्याचं टाळलं आहे. या मुलाला 30 महिन्यांसाठी लैंगिक गुन्हेगारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.