
कोरोना रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत अडकून पडलेले सुमारे 1200 मुंबईकर गुरुवारी सकाळी विशेष रेल्वेने मुंबईत परतले. इतर राज्यात अडकून पडलेल्या मुंबईकरांना मुंबईत घेऊन येणारी अशा प्रकारची ही पहिलीच विशेष प्रवासी रेल्वे आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचे महानगरपालिका सुरक्षारक्षक, आरोग्य कर्मचारी, मुंबई अग्निशमन दल आणि आरपीएफच्या समन्वयातून स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षेचे टप्पे योग्य रीतीने पूर्ण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, भाविक आणि प्रवाशांना त्यांच्या मूळ गाव किंवा शहरात जाण्यास सूट देण्यात आली आहे. मुंबईतून बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणच्या मजुरांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच दिल्ली आणि विविध भागात अडकून पडलेल्या मुंबईकरांना मुंबईत आणले जात असून बुधवारी दिल्लीवरून मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली. गुरुवारी सकाळी 9 वाजता ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली.
योग्य समन्वय, चोख व्यवस्था
गाडी, प्रवासी आणि प्रवाशांच्या सामानाचे मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी निर्जंतुकीकरण करण्याचे काम केले. त्यानंतर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. कोणत्याच प्रवाशामध्ये लक्षणे न आढळल्यामुळे त्यांच्या हातावर होम कोरेन्टाईनचा शिक्का मारून त्यांना 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी यादीप्रमाणे प्रवाशांची तपासणी केली. यावेळी महानगरपालिका सुरक्षारक्षक, आरोग्य कर्मचारी, मुंबई अग्निशमन दल आणि आरपीएफच्या यांच्या योग्य नियोजन, समन्वयातून स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षेचे टप्पे योग्य रीतीने पार पडले. प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बेस्ट बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या चोख व्यवस्थेबद्दल प्रवाशांनी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले.


























































