सहा महिन्यांत 124 जणांना सर्पदंश; दररोज सर्पमित्रांना 10 ते 15 कॉल्स

पावसाळा सुरू झाला की, साप या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे याच दिवसांत दरवषी सर्पदंशाच्या घटना अधिक होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते जुलै महिन्यापर्यंत १२४ जणांना सर्पदंश झाला असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

पावसाळ्यामुळे नागरीवस्तीमध्ये झाडेझुडपे वाढण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच लोकवस्तीजवळ असलेला कचरा लवकर उचलला गेला नाही, तर त्यामुळे उंदीर, घूस येतात. उंदीर हे सापांचे अन्न असल्याने अन्नाच्या शोधार्थ ते नागरीवस्तीमध्ये येतात. दरदिवशी सर्पमित्रांना शहरातील वेगवेगळ्या भागातून १० ते १५ कॉल्स येतात. सर्पदंशाची लस फक्त शासकीय, पिंपरी-चिंचवड पालिका रुग्णालयातच मिळते. खासगी रुग्णालयात फक्त प्रथमोपचार करून व्यक्तीला शासकीय किंवा पालिका रुग्णालयात पाठविले जाते. पिंपरी-चिंचवड शहराजवळील खेड, मंचर आदी भागांतून सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात येतात. पालिका रुग्णालयांत सर्पदंशावरील इंजेक्शन मोफत देण्यात येते. पूर्वी सर्पदंशाची लस फक्त वायसीएममध्येच उपलब्ध होती. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वायसीएम रुग्णालय गाठावे लागत होते. आता महापालिकेच्या फक्त वायसीएम, थेरगाव, आकुडीं, भोसरी, पिंपरी अशा पाच ठिकाणी सर्पदंशाची लस उपलब्ध आहे.

महापालिकेच्या वायसीएम, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी, भोसरी, थेरगाव या पाच रुग्णालयांत सर्पदंशाची लस उपलब्ध आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. त्यामुळे ज्या रुग्णालयात अतिदक्षता विभाग आहे, त्याठिकाणी लस उपलब्ध आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

प्रथमोपचार काय करावा..
खम स्वच्छ धुवा, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे. विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून बांधावे. विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून आवळून बांधावे. आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्यामध्ये पेन, काडी किंवा बोट धरावे. बांधल्यानंतर ते बाहेर काढावे. सर्पदंश झालेल्यास चहा, कॉफी किंवा कोणतेही पेय देऊ नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये, त्यामुळे जास्तीचा रक्तस्त्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. रुग्णालयात जाताना शक्यतो डॉक्टरांना फोनवर कळवावे, जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल. दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा अॅलर्जी अथवा एखादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.

गेल्या पाच वर्षातील सर्पदंशाची आकडेवारी
वर्ष सर्पदंश
२०२१ २०६
२०२२ ३८
२०२३ २४२ (१ मृत)
२०२४ २८६ (३ मृत)
२०२५ १२४ जुलैपर्यंत