
सोलापूर-विजापूर बाह्यवळण महामार्गावरील उड्डाणपुलावरून मृत्यू झालेल्या काळविटांची संख्या 13 झाली आहे. या परिसरात वाढलेली नागरी वस्ती व महामार्गांच्या कामांमुळे जंगलचे प्रमाण कमी झाले असून, प्राण्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. दोन जखमी काळविटांवर उपचार सुरू आहेत.
केगावजवळील उड्डाणपुलावरून 15 काळविटांच्या कळपाने उडी मारल्याने 11 काळविटांचा जागीच मृत्यू झाला होता, तर उपचारांदरम्यान दोन काळविटांचा मृत्यू झाला आहे. दोन जखमी कळविटांवर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असून, उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत.
या दुर्दैवी अपघातामागची प्राथमिक माहिती समोर येत असून, केगाव, हिरज, बेलाटी, तिऱहे या गावांच्या परिसरात हरिण व काळविटांची संख्या अधिक आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या सोलापूर-विजापूर हा महामार्ग वन्यजीवांच्या अधिवासातच येतो. या परिसरात वाढणारी नागरी वस्ती व महामार्गामुळे जंगलाचे प्रमाण घटले असून, वन्यजीवांना अन्न व पाण्याच्या शोधासाठी या महामार्गावरून भटकावे लागत आहे. सायंकाळच्या सुमारास कळपाने निघालेल्या काळविटांच्या मृत्यूला काहीअंशी ही कारणे जबाबदार ठरली आहेत.
वन विभागाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, अलीकडील काळात या परिसरातील जंगलाचे प्रमाण कमी झाल्याने हरिण, काळविटांबरोबरच वन्यजीवांचे जीवनमान धोक्यात आले आहे. याचा विचार करून या परिसरात वन्यप्राण्यांसाठी नियोजन व सुविधांविषयी रस्ते-महामार्ग प्राधिकरणास सूचना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वन्यजीव व पर्यावरणतज्ञांच्या शिफारशींनुसार शासनाकडे अहवाल देण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

























































